छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात दिली ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्रे; २ कोटी कागदपत्रांत शोधले आणखी पुरावे

मराठवाड्यात ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्र १ नोव्हेंबरपासून आजवर देण्यात आली आहेत. आठ जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणेने आजवर २ कोटी पुराव्यात शोधलेल्या सुमारे २७ हजार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या पुराव्यांच्या आधारे विभागातील सुमारे साडेपाच लाख जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल, असा दावा विभागीय प्रशासन करीत आहे.

एका पुराव्याच्या आधारे सुमारे २० जणांना वंशावळप्रमाणे प्रमाणपत्र मिळू शकेल. रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरूच राहणार आहे. समितीला रेकॉर्ड पाठविण्याचे काम संपले आहे, असे सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यात सध्या ३४६२ कुणबी जातींचे प्रमाणपत्र वाटप केले. सुमारे २ कोटी अभिलेख तपासणीत कुणबी जातीच्या २७ हजार नोंदी आढळल्या असून त्यासाठी खासरापत्र, पाहणीपत्र, क-पत्रक, कूळ नोंदवही, १९५१ चे राष्ट्रीय रजिस्टर, हक्क नोंद पत्र, फेरफार पत्र, ७/१२, गाव नमुना, प्रवेश निर्गम नोंदवही, अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना नोंद, कारागृहातील नोंदी, गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर, मुद्रांक विभागातील १३ प्रकारचे दस्तऐवज, भूमी अभिलेखमधील ७ दस्तऐवज, मुंतखब आदी तपासले आहेत. जुन्या कुणबी नोंदीवरून सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत मराठा समाज आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य शासनाने विभागात सर्व नोंदी तपासण्याचे आदेश दिले होते. तसेच सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे समिती स्थापन केली. प्रशासनाने नोंदीचे डिजिटायझेशन करून जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर अपलोड केले.

जिल्हा………………….दिलेले प्रमाणपत्र
छत्रपती संभाजीनगर…..३३७
जालना…………………५३६
बीड……………………१९०४
धाराशिव………………५१२
हिंगोली………………..४६
परभणी………………..३७
लातूर………………….४०
नांदेड………………….५०
एकूण………………..३४६२

२ कोटी पुरावे तपासले
२ कोटी कागदपत्रांच्या तपासणीत २७ हजार कुणबी नोंदी आढळल्या. त्याची माहिती प्रशासनाने सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या समितीला सादर केली आहे. समितीला पुरावे पाठविण्याचे काम संपले असले तरी रेकॉर्डची शोधमोहीम सुरूच राहणार आहे.

समिती अध्यक्ष स्वत: गेले हैदराबादला
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या पुराव्यांच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे यांनी स्वत: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागीय आयुक्तांसह हैदराबादला दोन दिवस दौरा करून पुराव्यांची शोधाशोध केली. तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर व नांदेड या तीन जिल्ह्यांत कुणबी नोंदीचे पुरावे कमी प्रमाणात आढळल्याने या तिन्ही जिल्ह्यांत नव्याने पुरावे तपासण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *