गुन्हा

दीरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची हत्या

गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पाच पथके नेमल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचे आठ वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. ते मुळचे हरयाणा राज्यातील खरडालीपूर (जि. इसार) येथील रहिवाशी आहेत. अमितला दारुचे प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासारवडवली जयवंत शिंदे यांच्या चाळीत राहणारा त्याचाच सख्खा लहान भाऊ (तिचा दीर) विकास धर्मवीर बागडी याच्यासोबत गेल्या सात वर्षांपासून मुलांसह राहत होती. 

अमित कधीतरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात यायचा. तसाच तो तीन दिवसांपासून ठाण्यात आला होता. मुलांना भेटण्याच्याच निमित्ताने तो भावाच्याच घरात मुले आणि पत्नीसोबत वास्तव्याला होता. नेहमीप्रमाणे त्याचा भाऊ विकास हा त्याच्या हाऊसकिपिंगच्या कामासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर रोजी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. 

सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावजय भावना तसेच दोन मुले ही रक्ताच्या थारोळयात मृतावस्थेत आढळली. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅटही होती. त्याने ही माहिती तातडीने त्याचे घरमालक जयवंत शिंदे (५०) यांना दिली. शिंदे यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, कासारवडवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत रोकडे, सहायक पोलिस निरीक्षक सुहास हटेकर आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीने मात्र तोपर्यंत तिथून पळ काढला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *