छत्रपती संभाजीनगर

बोगद्यातून ४१ कामगारांची सुटका करणाऱ्या देवदूतांचा छत्रपती संभाजीनगरात होणार सत्कार

उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढणाऱ्या एनडीएफचे जवान व कामगारांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात येणार आहे. अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लीम इंडियन ओरिजिन अमेरिका अँड कॅनडा या आंतरराष्ट्रीय संस्थेची ३० व ३१ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच शैक्षणिक परिषद होत असून त्यात या देवदूतांचा व देशभरातील ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. 

यासंदर्भात परिषदेचे आयोजक ‘रीड अँड लीड फाउंडेशन’चे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांनी सांगितले की, दोन दिवस चालणाऱ्या या अंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठचे कुलगुरू डॉ. मोहम्मद अस्लाम परवेज हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार इम्तियाज जलील, राज्यसभा खासदार फौजिया खान, अखिल भारतीय मुस्लीम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, मुजतबा फारूक हे प्रमुख पाहुणे असतील.

अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लीम इंडियन ओरिजिन अमेरिका अँड कॅनडा ही आंतरराष्ट्रीय संस्था मागील तीन दशकांपासून मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कल्याणासाठी कार्यरत आहे. या संस्थेमार्फत जगभरातील प्रमुख शहरांमध्ये शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात येते. परिषदेत प्रामुख्याने १० वी आणि १२ वीच्या तीन विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्यपदकांनी सन्मानित करण्यात येते. या ऐतिहासिक शहरात होणाऱ्या या परिषदेत देशभरातील २२ राज्यांतील ८० गुणवंत विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, संस्थेच्या ३२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच या शहरातील दोन विद्यार्थिनींचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात होणाऱ्या या परिषदेसाठी अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लीम इंडियन ओरिजिन या संस्थेचे १२ सदस्य उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अब्दुल कय्यूम नदवी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *