शेतकरी मित्र

शेतकऱ्यांनो सावधान! पुण्यात भात व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना गंडा

भोर तालुक्यातील नांदगावच्या ८ शेतकऱ्यांना आनेवाडीतील भात व्यापाऱ्याने दिलेले चेक वटले नसून पैशांना गंडा घालीत शेतकऱ्यांची फसवणूक केली. आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे शेतकरी हनुमंत पर्वती कुडले यांनी सांगितले.

भोर तालुका अतिपर्जन्यवृष्टीचा व दुर्गम डोंगरी असल्याने तालुक्यात वर्षभरात महत्त्वाचे भात हे प्रमुख पीक असून, सुमारे ७४०० हेक्टवर घेतले जाते. यासाठी जमीन तयार करणे, जमीन भाजणीनंतर पेरणी करणे त्यानंतर लागवड व काढणी करून भाताचे पीक काढले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च आणि कष्टही करण्यात येते. याच भातपिकावर बहुतांशी कुटुंबांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. फसवलेल्या चेकबाबत शेतकऱ्यांनी वकिलांच्या सल्ल्याने संबंधित व्यापाऱ्याला नोटीस पाठवली. मात्र सदर पत्त्यावर व्यापारी राहत नसल्यामुळे नोटीस परत आली असून व्यापाऱ्याचा फोनही बंद आहे. त्यामुळे आठ शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

अशीच घटना वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी गावात घडली असून, भोर तालुक्यातील सोयाबीन व्यापाऱ्याने आठ ते दहा शेतकऱ्यांना फसवल्याचे समोर येत आहे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांची टोळी भोर तालुक्यात सक्रिय असून या फसव्या व्यापाऱ्यांना आवर कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकरी हवालदिल

मागील काळात शेतकरी भातपीक मळून झाल्यानंतर भात भरडून तांदूळ तयार करून त्याची विक्री करीत होते. मात्र सध्या अनेक शेतकरी वर्ग भाताची भरडणी न करता भातविक्री करीत असतात. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नांदगाव ता. भोर येथील शेतकरी हनुमंत पर्वती कुडले आणि इतर ७ शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले इंद्रायणी जातीचे भात स्थानिक दलालांद्वारे आनेवाडी ता. जावली, जि. सातारा येथील भात व्यापारी नीलेश रवींद फरांदे यांना विक्री केले. व्यापाऱ्याने भात ताब्यात घेताना शेतकऱ्यांना काही रोख रक्कम व काही पुढील चार दिवसांचा चेक दिला होता. दीड महिना उलटून गेला तरी व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना दिलेले उर्वरित रकमेचे चेक बँकेत वाटले गेले नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *