राजकारण

संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली – दीपक केसरकर

 राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपावरून नाराजीनाट्य घडू शकते, असे म्हटले जात आहे. ठाकरे गट लोकसभेच्या २३ जागा लढणार असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावरून आता प्रतिक्रिया येत आहेत. यातच संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली, अशी टीका शिंदे गटातील नेत्यांनी केली आहे. 

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना फुटीबाबत भाष्य केले. उद्धव ठाकरे यांचे मत हिंदुत्वाबरोबर जाण्याचं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंची दिशाभूल करण्याचे काम संजय राऊतांनी केले आहे. पंतप्रधान मोदींना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेला आदर मी स्वत: पाहिलेला आहे, असे दीपक केसरकर म्हणाले.

शिवसेनेची फूटही टळली असती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते. पण, ही बातमी संजय राऊतांनी फोडली आणि शरद पवारांना सांगितली. त्यामुळे जनतेने ज्या युतीला मतदान केले होते, ती होऊ शकली नाही. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते, तर चांगले चित्र निर्माण झाले असते. तसेच, शिवसेनेची फूटही टळली असती, असा दावा दीपक केसरकर यांनी केला. 

दरम्यान, राम मंदिरासाठी सर्वात जास्त योगदान बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. ‘मला एक दिवस पंतप्रधान करा मी राम मंदिर बांधून दाखवेन आणि कलम ३७० हटवून दाखवेन’, असे बाळासाहेब ठाकरे यांचे मत होते. या दोन्ही गोष्टी पंतप्रधान मोदींनी पूर्ण केल्या आहेत, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *