धुळे

धुळे पोलिसांनी रोखली गुंगीकारक औषधांची तस्करी; ५८० बाटल्या, गोळ्या केल्या हस्तगत

एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चार जणांकडून गुंगीकारक औषधाच्या सुमारे ५८० बाटल्या व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच हजाराहुन जास्तीच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

राज्यात सध्या ललित पाटील ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असताना धुळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या व गुंगीकारक औषधांचा साठा सापडल्यामुळे पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. एलसीबीने मोहाडी हद्दीतून एका इसमाला ताब्यात घेतले होते. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गुंगीकारक औषधाच्या बाटल्या आढळून आल्या.

सदर बाटल्या जप्त करण्यात आल्यानंतर बाटल्यांबाबत विचारपूस केली असता, देवपुरातील विष्णू नगरातील मेडीकलवर काम करणाऱ्या तरुणाकडून बाटल्या आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने मेडीकलवरील तरुणालाही ताब्यात घेत त्याच्याकडून देखील गुंगीकारक औषधांच्या बाटल्या हस्तगत केल्या त्यामुळे संबंधित मेडिकलचा परवाना रद्द करण्यासंदर्भातील पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. 

तसेच यामध्ये वाडीभोकर परिसरातील राहणाऱ्या वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) चा ही सहभाग असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार त्याचा देखील शोध पोलिसांनी घेतला असता त्याच्याकडेही मोठ्या प्रमाणात गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांचा साठा पोलिसांना आढळून आला. नशेच्या काळ्या बाजारातील या चौघांच्या मुस्क्या आवळल्यानंतर आता पोलीस या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आणखी नशेच्या सौदागरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *