छ. संभाजीनगर

परीक्षेत मोबाइल समोर ठेवून करा बिनधास्त कॉपी; परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाइल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कॉपीचे व्हिडीओसह चित्रण करीत परीक्षार्थींचे मोबाइल जप्त करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकले. हे कुलगुरूंना समजताच त्यांनी परीक्षा संचालकांची कानउघाडणी करीत परीक्षेसाठी बैठे पथक नेमण्याचे आदेश दिले. या घटनेची चौकशी करण्यासाठी सहकेंद्रप्रमुखासह अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले.

विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या परीक्षांना १२ डिसेंबरपासून सुरुवात झाली. अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. दशरथ रोडे यांची दि. १३ डिसेंबर रोजी सहकेंद्रप्रमुख म्हणून परीक्षा विभागाने नियुक्ती केली. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी रोडे तेथे गेले. त्यांनी रुजू झाल्याचे पत्र दिले. मात्र, ते पत्र प्राचार्य तथा केंद्रप्रमुखांनी सही करून त्यांना परत देऊन विद्यापीठाला पाठविणे अपेक्षित असताना प्राचार्यांनी विलंब लावला. तोपर्यंत परीक्षा सुरू झालेली होती. प्रा. रोडे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पाहणी केली असता, पर्यवेक्षकांसमोर विद्यार्थी थेट मोबाईल समोर ठेवून उत्तरपत्रिका लिहीत होते. या प्रकाराचे त्यांनी व्हिडीओ काढले. त्यानंतर मोबाइल जप्त केले. हे सर्व मोबाइल एका ठिकाणी ठेवले. तेव्हा प्रा. रोडे यांना परीक्षार्थींकडून धमकावण्यात आल्याचे त्यांनी कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

यासोबत त्यांनी व्हिडीओ सुद्धा पाठविले आहेत. या प्रकारानंतर महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सहकेंद्रप्रमुख प्रा. रोडे हे यापूर्वीही महाविद्यालयात जेसीएस हाेते. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याचे पत्रपरीक्षा संचालकांना पाठविले. त्यानुसार परीक्षा संचालकांनी सायंकाळी आदेश काढून प्रा. रोडे यांनाच पदावरून हटविले. हा प्रकार समजताच विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, प्रा. उमाकांत राठोड, प्रा. शेख जहूर आणि प्रा. हरिदास उर्फ बंडू सोमवंशी यांनी कुलगुरूंची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *