आरोग्य

मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ?

मासिक पाळीचे ते चार दिवस हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय नाजूक दिवस असतात. या चार दिवसात स्त्रीच्या शरीरात अतिशय वेगवेगळे बदल घडून येतात, याचबरोबर अनेक हार्मोनल चेंजेस होताना दिसतात. मासिक पाळीच्या दरम्यान त्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची खरी गरज असते. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ होणे, मूड स्विंग, पायात पेटके येणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसांत स्त्रियांनी स्वतःची विशेष काळजी घेणं गरजेचं असत. मासिक पाळीच्या काळात थोडासा निष्काळजीपणा किंवा आरोग्याची देखभाल न करणे यांसारख्या गोष्टी आपल्याला भविष्यात त्रास देऊ शकतात. या दिवसांत पर्सनल हायजिनसोबतच महिलांनी आपल्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेतलीच पाहिजे. 

मासिक पाळी दरम्यान पर्सनल हायजिन व शरीराची स्वच्छता ठेवण्यासाठी दिवसांतून किमान दोनवेळा आंघोळ करणे हा उत्तम पर्याय आहे. या काळात आंघोळ केल्याने शारीरिक स्वच्छतेसोबतच आपल्याला फ्रेश राहण्यास मदत मिळते. मासिक पाळीदरम्यान पुरेशी स्वच्छता न ठेवल्यामुळे महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची (यूटीआय) समस्या होऊ शकते. म्हणूनच मासिक पाळीदरम्यान काही खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठीच मासिक पाळी दरम्यान आंघोळ करताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, ते पाहूयात.

१. मासिक पाळी दरम्यान आपण जे पॅड किंवा कप वापरत असाल ते काढून टाकण्याची खात्री करावी. 

मासिक पाळी दरम्यान आंघोळ करताना आपण जर कप किंवा पॅड लावले असेल तर ते आंघोळीपूर्वी काढून टाकावे. काहीजणी आंघोळ करताना रक्तस्त्राव थांबावा म्हणून पॅड किंवा कप तसाच ठेवून मग आंघोळ करतात, परंतु हे चुकीचे आहे. आंघोळ करताना मासिक पाळीचा रक्तस्त्राव होत असेल तर तो नैसर्गिकरित्या होऊ द्यावा. आंघोळ करताना होणारा रक्तस्त्राव थांबवू नका. याचबरोबर प्रायव्हेट पार्ट जवळ असणाऱ्या प्यूबिक हेअर्सची स्वच्छता राखा. आंघोळी दरम्यान जुने वापरलेले पॅड, टॅम्पॉन काढून टाकताय याची खात्री करुन घ्यावी. 

२. योनी मार्गाची स्वच्छता करणे गरजेचे आहे. 

मासिक पाळीत आंघोळ करतं असताना योनी मार्गाची स्वच्छता करणे अतिशय महत्वाचे असते. योनी मार्गाची स्वच्छता करण्यासाठी गरम किंवा थंड पाण्याचा वापर न करता साध्या नॉर्मल पाण्याचा वापर करावा. योनी मार्ग स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा इतर केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करणे टाळावे. कारण केमिकल्सयुक्त व सुगंधित प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने इंन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. 

३. योनी मार्ग आतून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करु नका. 

साबण किंवा पाण्याचा वापर करुन योनी मार्ग आतून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करु नका. योनी मार्ग स्वतःची स्वच्छता स्वतः करत असते, त्यामुळे आपल्याला त्याची वेगळी स्वच्छता करण्याची गरज भासत नाही. जर आपण योनी मार्ग आतून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इंन्फेक्शन होऊ शकते. यामुळे योनी मार्गात जळजळ होणे, पुरळ येणे, खाज उठणे यांसारख्या समस्या होऊ शकतात. याचबरोबर योनी मार्ग आतून स्वच्छ केल्यास आतील त्वचेची ph पातळी ही कमी जास्त होऊन योनी मार्गासंबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योनी मार्ग नेहमी बाहेरुनच स्वच्छ करावे तसेच कायम पुसून कोरडे ठेवावे. 

४. मासिक पाळीच्या काळात किमान दोन वेळा तरी आंघोळ कराच. 

मासिक पाळीच्या काळात किमान दोन वेळा तरी आंघोळ करुन शारीरिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. आंघोळ करताना अतिशय गरम किंवा थंड पाण्याचा वापर करु नये. थंड पाण्याने अजिबात आंघोळ करु नये, यामुळे आपल्या शरीरातील रक्ताच्या चक्रावर त्याचा परिणाम होतो. यासाठीच पाळी दरम्यान आंघोळ करताना साध्या नॉर्मल पाण्याचा वापर करावा. 

५. बाथरुम स्वच्छ आहे ना ?

मासिक पाळी दरम्यान आंघोळीला जाताना बाथरुम स्वच्छ आहे ना याची खात्री करुन घ्या. बाथरुम स्वच्छ असणे हे आपल्या शारीरिक हायजिनच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असते. यामुळे मासिक पाळी दरम्यान आंघोळीला जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर बाथरुम स्वच्छ ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *