गुन्हा

डॉक्टरला खंडणीची मागणी

उपराजधानीतील गुन्हेगारीचे पडसाद राज्याच्या विधीमंडळातदेखील उमटले असताना हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भर अधिवेशन काळातच गुंडांनी एका डॉक्टरला खंडणीची मागणी केली. तसेच त्यांना दोन लाखांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

डॉ.गजानन प्रल्हादराव पवाने (५३, एमआयजी कॉलनी, मेडिकल चौक) यांचा शिवणगाव येथे दवाखाना आहे. १६ डिसेंबर रोजी ते दवाखाना बंद करत असताना आलोक अरविंद मेश्राम (४०, बेझनबाग, जरीपटका) व अश्वीन रमेश तांगडे (३५, सुगतनगर, जरीपटका) हे तेथे पोहोचले. आलोकने पवाने यांना अडवले व तुम्ही रुग्णांना मारता की सेवा करता हे मला माहिती आहे. मी सामाजिक नेता आहे व तुझ्याकडे किती संपत्ती आहे याची मला माहिती आहे. जर आम्हाला दोन लाख रुपये दिले नाहीत तर तुला व कुटुंबाला पाहून घेईल, अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरललेल्या पवाने यांना दोघांनीही कारमध्ये बसण्यास सांगितले. 

मात्र डॉक्टर स्वत:च्याच कारमध्ये बसून राहिले. आलोक जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये शिरला व त्यांचा मोबाईल फोन हिसकला. त्यानंतर त्यांना वर्धा मार्गावरील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये घेऊन गेला. त्याच्या सांगण्यावरून डॉ.पवाने यांनीत्याला साडेतीन हजार रुपये काढून दिले. तेव्हाच आरोपीने त्यांचा मोबाईल परत दिला.हा प्रकार कुणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली.त्यानंतर आरोपी एमएच २७ एसी ४५६७ या कारने फरार झाले. १७ डिसेंबर रोजी दोन्ही आरोपींनी फोनवरून डॉ.पवाने यांना परत धमकी दिली. अखेर त्यांनी सोनेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *