पुणे

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची २७ डिसेंबरपासून महाअंतिम फेरी

महाराष्ट्रातील संगीत नाटकांची बीजे आंध्र प्रदेशात सुरभि थिएटरच्या माध्यमातून रुजविणाऱ्या वनारसे कुटुंबातील कलावंत तब्बल १२० वर्षांनंतर पुण्यात येत आहेत. संगीत नाटकासह हौशी, व्यावसायिक रंगभूमीवरील कलावंत, दिग्दर्शकांशी संवाद साधणार आहेत. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी २७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या निमित्ताने वनारसे कुटुंबीयातील कलावंत अजयकुमार वनारसे कलावंतांशी संवाद साधणार आहेत.

वनारसे कुटुंबीय मूळचे महाराष्ट्रीयन. अलिबाग येथून पुणे आणि पुण्यातून थेट आंध्र प्रदेश. वनारसे कुटुंबीय १२० वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशात गेले ते महाराष्ट्रातील संगीत नाटकाची बीजे घेऊन. तेथे त्यांनी सुरभि थिएटरची मुहूर्तमेढ रोवली आणि संगीत नाटकांची निर्मिती सुरू केली. त्याकाळी त्यांना मदत झाली ती आंध्र प्रदेशात बाहुल्यांचे खेळ करणाऱ्या कलावंतांची.

व्ही. व्ही. एल. श्रीनिवास, एस. पी. आदिनारायण आणि अजयकुमार वनारसे हे स्पर्धेदरम्यान महाराष्ट्रातील संगीत नाटक, प्रायोगिक रंगभूमी या संदर्भात पुण्यातील रंगकर्मी प्रसाद वनारसे, शुभांगी दामले, दीप्ती भोगले, डॉ. प्रवीण भोळे, रवींद्र खरे, राजीव परांजपे यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा संवादात्मक कार्यक्रम दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आहे. या चर्चेसाठी महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी पुढाकार घेतला आहे.

महाअंतिम फेरीचे लॉट्स मंगळवारी निघणार

स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे लॉट्स मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता फडके हॉल येथे काढण्यात येणार असून, ही फेरी दि. २७ ते दि. २९ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्यमंदिरात होणार आहे. पाच सत्रांत १९ संघांचे सादरीकरण होणार आहे. दि. २९ रोजी सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *