चंद्रपूर विदर्भ वृत्त

एक-दोन नाही तर विद्यार्थ्यांना तब्बल सहा वाघांचे दर्शन, वनविभागाने घडवून आणली ताडोबा सफारी 

वाघांचा जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघांसह अन्य प्राण्यांची संख्या आहे. ताडोबामध्ये तर वाघ बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. मात्र, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जंगल सफारी व्हावी, त्यांना निसर्गाचा अभ्यास करता यावा, यासाठी वनविभागाने चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा येथील विद्यार्थ्यांना ताडोबाची जंगल सफारी घडवून आणली. यामध्ये विद्यार्थ्यांनी धमाल मौजमस्ती करीत जंगल सफारीचा आनंद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना एक-दोन नाही तर तब्बल सहा वाघांचे दर्शन झाले.
जिल्ह्यात जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य आहे. ताडोबामध्ये जाण्यास प्रत्येक जण इच्छुक असतात; मात्र प्रत्येकवेळीच शक्य होत नाही. मात्र, चक्क वनविभागानेच जंगल सफारीसाठी पुढाकार घेतल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही.

या शाळेच्या तब्बल ४० विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासह त्यांच्या नाष्ट्याचीही व्यवस्था मोफत करण्यात आली होती. सफारीमध्ये विद्यार्थ्यांनी अगदी मनसोक्त ताडोबा बघण्याचा आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्राण्यांसह वाघही बघता आला. विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक अशोक मुसळे, सहायक शिक्षिका निरंजना पोटे सहभागी झाले होते.

सहल घडविल्याबद्दल मुख्याध्यापक अशोक मुसळे, पदवीधर शिक्षक प्रशांत कातकर, सहायक शिक्षिका निरंजना पोटे, ज्योती खरकाटे यांनी वनविभागाचे आभार मानले.

वाघ, हरीण आणखी काही

ताडोबाच्या पर्यटनासाठी देश-विदेशातील अनेक पर्यटक येतात. काही वेळा त्यांना वाघ दिसतात तर काही वेळा दिसत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक हिरमुसतात. मात्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा येथील विद्यार्थ्यांना या पर्यटनवारीमध्ये तब्बल सहा वाघांचे दर्शन झाले. एवढेच नाही हरीण, रान गाय, मोर, कोल्हे अशा अनेक प्राण्यांना जवळून बघता आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *