नागपूर

Soyabean Rate Down below MSP ; सोयाबीनच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम, व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी भावात खरेदी

वाशिम: कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने घसरण झाली आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी सरासरी अवघा ४ हजार ते ४ हजार ४०० रुपयांपर्यंतच बाजार भाव मिळत आहे. त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत. खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र, सुरुवातीलाच पावसाने उशिराने हजेरी लावल्याने पेरण्या उशिरा झाल्या. सोयाबीन परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना येलो मोझ्याक सारखा रोगही सोयाबीनवर आला होता. सोयाबीन काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. सोयाबीन लागवडी पासून ते काढणीपर्यंत सरासरी १० ते १५ हजार रुपये खर्च लागतो त्या तुलनेने पाहिजे तसे उत्पन्न झाले नसून एकरी ३ ते ४ क्विंटल उतारा झाला आहे. त्यातच सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसल्याने लागवड खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावर्षी सुरवातीपासूनच सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली आहे. ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे तेच शेतकरी बाजार समितीत सोयाबीन विकायला नेत आहेत.

केंद्र सरकारने यावर्षी सोयाबीनला ४ हजार ६००रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, त्यापेक्षाही कमी दरात सोयाबीन विकलं जातंय. केंद्र सरकारनं खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केल्यानं सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. केंद्र सरकार सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्यानं शेतकरी मोठा रोष व्यक्त करत असून सोयाबीन तेलाची आयात बंद करून निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसह सोयाबीनला किमान ६ ते ७ हजार रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

समितीला पडला विसर

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शेतमालाची किमान आधारभूत किमतीवर नाफेडच्या वतीने खरेदी केली जाते. खरेदी करताना शासनाने निर्धारित केलेला एफ. ए. क्यू. दर्जाचा शेतमाल हमीभावाच्या दराने खरेदी करणे अपेक्षित असते. तर नॉन एफ. ए. क्यू. दर्जाच्या शेतमालाला स्थानिक पातळीवर नेमलेल्या समितीने प्रमाणित करणे आवश्यक असून प्रमाणीकरण केल्यानंतर शेतमालाची खरेदी करणे आवश्यक आहे. मात्र, समितीला याचा विसर पडला असून बाजार समितीत आलेला सर्वच शेतमाल नॉन एफ. ए. क्यू. दर्जाचा समजून व्यापारी त्याची मनमानी पद्धतीने खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमिभावापेक्षा कमी दर मिळत आहेत. त्यामुळे नावाला बनलेल्या या समितीवर कारवाई करणे आवश्यक आहे.
केळीच्या शेतात आंतरपीक म्हणून खरबूज शेतीचा निर्णय गेमचेंजर, नांदेडच्या शेतकऱ्याची लाखोंची कमाई
कोण आहेत समिती सदस्य

१)कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव.
२) संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतवारिकार
३) संबंधित शेतकरी.

भाव पाडून खरेदी करत असल्यास शेतकऱ्यांनी करावी तक्रार; कारवाई केली जाणार

केंद्र शासनाने सोयाबीनला ४ हजार ६०० रुपये आधारभूत किंमत ठरवली आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शासन परिपत्रकानुसार नेमलेल्या समितीने नॉन एफ ए क्यू दर्जाच्या शेतमालाचे प्रमाणिककरण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना परवडणार नाही, अशा पद्धतीने भाव पाडून शेतमाल खरेदी केली जात असेल तर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार करावी त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी म्हटलं.
कांद्याची घरंगळ थांबेना! डिसेंबरपासून दर उतरणीला, लासलगावला लिलाव पाडले बंद, किलोला किती भाव?

योग्य भाव मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा..

शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी नेण्याआधी आजूबाजूच्या बाजार समितीमध्ये बाजार भाव तपासून घ्यावा त्यानंतरच शेतमाल विक्रीसाठी न्यावा असा सल्ला वाशिमचे जिल्हा उपनिबंधक यांच्या वतीने देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमालाला जोपर्यंत चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा ,असेही आवाहन वाशिम जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी केले आहे.
Soyabean Rate: सोयाबीनला मिळेना भाव; हमीभावही मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *