राजकारण

नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आज कळले असेल; फडणवीसांचा कॉंग्रेसला चिमटा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांदरम्यान कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘पनौती’ अशी टिप्पणी करत सोशल माध्यमांवर मोहीमच चालवली होती. मात्र निकालानंतर भाजप नेत्यांनी या ट्रेंडवरून कॉंग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. चारपैकी तीन राज्यात भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पारदर्शी प्रामाणिकतेचा विजय आहे. या निकालाने नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आता कळून चुकले असेल, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

चार राज्यातील निवडणूक निकालांवर नागपूर येथे ते रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ज्या पारदर्शी प्रामाणिकतेने पंतप्रधानांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबविला, सरकार खऱ्या अर्थाने जनतेसाठी काम करते आहे, हा विश्वास त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केला. या निकालाने जनतेने इंडी आघाडी आणि राहुल गांधी यांचा अजेंडा नाकारला हेही स्पष्ट झाले. नेमकी पनौती कोण हेही आता काँग्रेस पक्षाला कळाले असेल आणि त्यामुळे भविष्यात ते असे शब्द आता वापरणार नाहीत, असे ते म्हणाले.

आता ईव्हीएमवर फोडतील खापर
आता इंडी आघाडीची लवकरच बैठक होईल व ते ईव्हीएमवर खापर फोडतील. जोपर्यंत या मानसिकतेतून काँग्रेस बाहेर पडत नाही, तोवर त्यांचे काहीच होऊ शकत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपाचेच सर्वाधिक खासदार निवडून येतील. महाराष्ट्रात सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश आम्ही मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *