राजकारण

“तेलंगणातील विजयाचा फायदा महाविकास आघाडीला”; रोहित पवारांचा अजित दादांनाही टोला

विधानसभा निवडणूक झालेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने विरोधकांना अस्मान दाखवलं. या निकालाचे पडसाद देशभर उमटत असून भाजपच्या विजयामुळे एनडीएला पाठिंबा जाहीर केलेले राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच खूश झाल्याचं पाहायला मिळालं. आमचा निर्णय काहींना पटला नाही, पण देशाला मोदींशिवाय पर्याय नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे. मात्र, या निकालावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी शिंदे व अजित पवार गटाला टोला लगावला. तसेच, तेलंगणातील विजयाचा फायदा विदर्भ व मराठवाड्यात महाविकास आघाडीला होईल, असेही ते म्हणाले.

४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीला खोचक टोला लगावला आहे. “इंडिया-इंडिया करणारे जे आहेत, ते आता ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाला, अशा पद्धतीचं बोलायला सुरुवात करतील. पण त्यात काहीही तथ्य नाही. लोकांनी पंतप्रधान मोदींकडे बघून भाजपला पाठिंबा दिला आहे. या विजयाबद्दल मी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह सगळ्यांचं अभिनंदन करतो,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. दुसरीकडे या विजयानंतर खुश झालेल्या शिंदे-पवार गटाला रोहित पवार यांनी टोला लगावला.

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने काँग्रेसच्या नेत्यांना जवळं केलं, त्यांना जवळ करुन सरकार बनवलं. पण, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य सिंधिया यांच्या कार्यक्षेत्रात काँग्रेसला यश मिळालं आहे. म्हणजेच, भाजपाने सिंधियांना सोबत घेऊन त्याचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केलाय. भाजपाकडून तसंच केलं जातं, जे मध्य प्रदेशात केलं, तेच महाराष्ट्रात होईल का, सिंधियांप्रमाणे शिंदे आणि अजित पवार गटाचंही राजकीय अस्तित्त्व संपवलं जाईल का, असा प्रश्न शिंदे व अजित पवार गटाला पडला असेल, असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला होईल, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

भाजपाचा तीन राज्यातील विजय हा अजित पवारांचा पायगुण असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं, याबाबत रोहित पवारांना विचारलं असता, अंधविश्वासावर आमचा विश्वास नाही. भाजपा अजित पवारांचं काय करतंय, हे टप्प्याटप्यानं बघा. आजही तुम्हाला सह्या घेतल्यानंतर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या टेबलवरुन मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल्स पाठवाव्या लागतात. अजित पवार गटाच्या खांद्यावर बंदुक ठेऊन भाजपा काम करतंय. भाजपाकडून दिलेली स्क्रीप्ट त्यांच्या भाषणात दिसते, भाजपाने सांगितलेलं ते बोलत आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार गटावरही हल्लाबोल केला आणि मिटकरींच्या विधानावर मत व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *