राजकारण

ना स्वत: काम करतील, ना इतरांना करू देतील ! माेदी यांची विराेधकांवर टीका

देशात विरोधकांचा एक गट अजूनही जुन्याच मानसिकतेचा आहे. ना स्वत: काम करतील आणि ना इतरांना करू देतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधानांनी रविवारी अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेचा आभासी पद्धतीने शुभारंभ केला. याअंतर्गत देशभरातील १,३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानकांचा समावेश असून, ही स्थानके २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा या योजनेत समावेश आहे.

विराेधकांवर नकारात्मक राजकारणाची टीका करताना पंतप्रधान म्हणाले, विरोधी पक्ष स्वत: काम करत नाही आणि आम्हाला काम करू देत नाहीत. जेव्हा आम्ही संसदेची नवीन इमारत बांधली, राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी विरोध केला, अशी टीका मोदी यांनी केली.

तुम्ही दिलेला कर वाया जात नाही
एकेकाळी २ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागत हाेता. आता ७ लाख रुपयांचे उत्पन्नही करमुक्त आहे. करदाते वाढले आहेत. लाेकांचा सरकार आणि देशाच्या विकासावर विश्वास असल्याचेच यातून दिसते.
– नरेंद्र माेदी, पंतप्रधान  एका वर्षात ऑस्ट्रेलियाच्या एकूण रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त रेल्वेमार्ग टाकण्यात आल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला. आम्ही एका मिशनप्रमाणे सकारात्मक राजकारणाच्या मार्गावर आहाेत. काेणत्या राज्यात काेणाचे सरकार, काेणाची व्हाेटबॅंक अशा गाेष्टींचा विचार न करता आम्ही विकासाला सर्वाेच्च प्राधान्य देत आहाेत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *